राष्ट्रपती पदक मिळूनही दहा वर्षे लोटली; सात पोलिस अजूनही पदकांच्या प्रतीक्षेत

गोंदिया, दि. २ (प्रतिनिधी) –
गुन्हेगारी व नक्षलवादाविरुद्ध धाडस दाखवून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना शासनाकडून सन्मानित करण्यात येते. अशा गौरवामुळे केवळ त्यांचे मनोबल वाढत नाही तर सहकाऱ्यांनाही प्रेरणा मिळते. मात्र, गोंदियातील सात पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक (शौर्य) जाहीर होऊन तब्बल दहा वर्षे उलटली तरी त्यांना अद्याप पदक मिळालेले नाही.
१७ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन डीआयजी रवींद्र कदम यांच्या आदेशानुसार एपीआय राजेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवरी तालुक्यातील नक्षलप्रवण चिकघर पोलिस ठाणे हद्दीत कारवाई केली होती. या कारवाईत नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षल्यांवर एकूण ५४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या गटात विभागीय समिती सदस्य लसुलाल यासह दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश होता. पोलिसांनी या ठिकाणावरून एके-४७ रायफल, तीन एसएलआर, आठ पिस्तुले व मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त केली होती. १९९३ नंतर प्रथमच पोलिसांनी नक्षल्यांकडून एके-४७ हस्तगत केली होती.
या यशस्वी मोहिमेमुळे गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आणि नक्षलविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल एपीआय तिवारी यांच्यासह पीएसआय संदीप मस्के, पीएसआय अविनाश गदाख, आणि पोलीस कर्मचारी रमेश येडे, उमेश इंगळे, वामन पारधी, राधेश्याम गट्टे यांना राष्ट्रपती पोलिस पदक (शौर्य) जाहीर झाले होते.
मात्र, पुरस्कार घोषित होऊनही आज दहा वर्षे लोटली तरी या सात शूर पोलिसांना प्रत्यक्ष पदके मिळालेली नाहीत. त्यामुळे “योग्य सन्मानाचा झगमगता पदक” मिळण्याची त्यांची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे.


