best news portal development company in india

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक — “कर्जमाफी द्या, हेक्‍टरी ६० हजार भरपाई द्या”

SHARE:

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक — “कर्जमाफी द्या, हेक्‍टरी ६० हजार भरपाई द्या”

# सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल; सत्ताधारी व विरोधकांवर टीका

गोंदिया :— राज्यात एका बाजूला नागपूरमध्ये शेतकरी आंदोलनाची तयारी सुरू असताना आणि शेतकऱ्यांच्या काही मागण्या बच्चू कडू यांनी मान्य करून दिलासा दिल्याची घोषणा होत असतानाच दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी भीषण संकटात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे कापून शेतात टाकलेला मोठ्या प्रमाणात धान भिजून खराब झाला असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.

धान ओला होऊन चिंब भिजल्याने ते खाण्यायोग्य व विकण्यायोग्य न राहिल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिलेले नाही. परिणामी शेतकरी आता तीव्र संताप व्यक्त करीत ‘आमचे आता कोण ऐकणार?’ असा सवाल उपस्थित करत आहेत.
यासंदर्भातील एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शेतकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके, तसेच जिल्ह्यातील सर्व सत्ताधारी आणि विरोधी आमदार-नेत्यांना थेट उद्देशून प्रखर शब्दांत सवाल विचारताना दिसत आहेत.
> “ज्याप्रमाणे धान बोनस मिळाल्यावर मोठमोठे बॅनर लावता… हमीभावाचे फलक लावता… आज मात्र शेतकरी संकटात असताना कुठे आहात? शेतकरी जगला तर राज्य जगेल; आमची साथ द्या, कर्जमाफी द्या आणि हेक्टरी ६० हजार नुकसान भरपाई जाहीर करा,” अशी मागणी व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभे आणि कापलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. शेतकरी मंडळी आता तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आर्त हाक देत आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी लवकरात लवकर पुढे येऊन मदत जाहीर करावी, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी होत असून शेतकरी संघटनांनीही सरकारने त्वरित जाहीर कार्यक्रम जाहीर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :हेक्टरी ₹६०,००० नुकसान भरपाई,सरसकट कर्जमाफी,त्वरित सरकारी पंचनामे,खराब झालेल्या धानाची सरकारी खरेदी करण्याची मागणी करण्यात आले आहे.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment