गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग : रुग्ण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गोंदिया – गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. त्या वेळी ओपीडी सुरू असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी धावपळ उडाली. काही काळासाठी परिसर धुराने व्यापला होता. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग विझवण्यात आली आणि मोठी जीवितहानी टळली.
रुग्णालयातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शॉर्टसर्किट झाल्यानंतर काही क्षणांतच परिसरात धूर पसरला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि प्रत्येकजण मिळेल त्या मार्गाने सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
#रुग्ण सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह या घटनेत जीवितहानी टळली असली तरी रुग्णालयातील सुरक्षेची मर्यादा उघड झाली आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात अलार्म वा आग लागल्यास त्वरित सतर्क करणारी यंत्रणा नसल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ही बाब गंभीर असून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
गेल्या काही दिवसांत गोंदिया शासकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातही अशाच प्रकारची आग लागली होती. याशिवाय, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात २०२१-२२ मध्ये शॉर्टसर्किटमुळे बालकक्षात आग लागून ११ बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अद्यापही ताजी आहे.
#अधिष्ठात्यांची प्रतिक्रिया “आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास ओपीडी जवळ घडली होती. अग्निशमन विभाग व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेळेतच नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही,” असे अधिष्ठाता डॉ. कुसुमाग्रज घोरपडे

यांनी स्पष्ट केले.
#सतर्कतेची गरज रुग्णालये ही रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची शेवटची आशा असतात. अशा ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना घडत असल्याने फायर ऑडिट, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी व आग प्रतिबंधक यंत्रणेचे कार्यान्वयन तातडीने करणे आवश्यक आहे.अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
# नागरिक व प्रशासन यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देत सुरक्षाव्यवस्था काटेकोरपणे राबवावी, हीच काळाची गरज आहे.


