भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी; गोंदियातही आंदोलन

गोंदिया :-भारत–पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शनिवारी (१४ सप्टेंबर) राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करत “पाकिस्तान मुर्दाबाद”, “भारत–पाक सामना रद्द करा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनाची झलक गोंदिया जिल्ह्यातही पाहायला मिळाली.
दुबई येथील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज भारत–पाक सामना रंगणार आहे. मात्र, पाकिस्तानने वारंवार केलेल्या दहशतवादी कारवाया आणि देशातील सैनिकांच्या हौतात्म्यामुळे हा सामना खेळला जाऊ नये, अशी भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली. आंदोलनादरम्यान पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीसोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूरच्या पुड्या पाठविण्याचा इशाराही देण्यात आला.
गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील कार्यालयासमोर शिवसैनिक जमले. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या पाकिस्तानविषयक धोरणाचा निषेध नोंदविला.
शैलेश जायस्वाल म्हणाले, “भारत सरकारची हिंदूविरोधी नीती स्पष्ट दिसून येते. देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. सिंदूर ऑपरेशनमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मात्र आजही सरकार पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध ठेवत आहे. हे देशविरोधी कार्य आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.”
राज्यभर पेटलेले हे आंदोलन गोंदियातही मोठ्या उत्स्फूर्ततेने पार पडले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.


