best news portal development company in india

कुंभारटोलीवासीयांचा नगरपरिषदेवर हल्लाबोल

SHARE:

कुंभारटोलीवासीयांचा नगरपरिषदेवर हल्लाबोल

# “एक नारी सबसे भारी”च्या घोषानांची महिला गर्जना.

# शासनाचे नवीन परिपत्रक कधी निघेल ?

आमगाव, दि. ९ ऑक्टोबर (प्रतिनिधी):आमगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील कुंभारटोली परिसरातील नागरिकांनी आज सकाळी मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात नगरपरिषद कार्यालयासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्त्या राणी काळसर्पे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. “रस्ता द्या, पाणी द्या, घरकुल द्या, स्वच्छता द्या, न्याय द्या” तसेच “एक नारी सबसे भारी” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

#मूलभूत सुविधांचा अभाव,लोकांचा संताप अनावर

कुंभारटोली परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाईचा अभाव, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, सार्वजनिक प्रकाशयोजनांचे बिघाड आणि घरकुल योजनेतील विलंब या समस्या कायम आहेत. नागरिकांनी नगरपरिषदेचे अनेकदा लक्ष वेधले असले तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
पावसाळ्यात चिखल व दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून लहान मुलांना शाळेत जाणेही अवघड झाले आहे. महिलांनी सांगितले की, “शहरात राहूनही आम्ही अजूनही गावाच्या परिस्थितीत जगतो आहोत.”

प्रशासक राज आणि शासनाची घोडचूक — नागरिक योजना वंचित

आमगाव नगरपरिषदेवर गेल्या नऊ वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पूर्वीच निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यातच अलीकडे शासनाने नगरपरिषद क्षेत्रातील सात गावे वेगळे करून ग्रामपंचायतींत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला, तर आमगावला नगरपरिषद म्हणून कायम ठेवले आहे. मात्र, या संदर्भातील नवीन अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही.
शासनाच्या या घोडचुकीमुळे नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शहरी विकास योजनांचा लाभ मिळत नाही. परिणामी, पायाभूत सुविधा ठप्प झाल्या असून कंत्राटदार व प्रशासक मनमानी कारभार करत असल्याची नागरिकांत भावना आहे.
# लोकप्रतिनिधींची भूमिकाही प्रश्नचिन्हाखाली
आमगाव शहरातील जनतेचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्व परिस्थितीकडे मुकदर्शक भूमिकेतून पाहत आहेत. नागरिकांनी विचारले — “आमचे प्रश्न कोण सोडवणार? शासन, प्रशासक की आमचे निवडून दिलेले प्रतिनिधी?”

# प्रशासनाचे आश्वासन — तातडीने उपाययोजना

आंदोलनानंतर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई आणि प्रकाशव्यवस्था सुधारण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले. मात्र नागरिकांनी स्पष्ट केले की, “आश्वासन पुरेसे नाही, प्रत्यक्ष कृतीच हवी.”

# नागरिकांच्या संघर्षातून जागृत होईल का प्रशासन?

कुंभारटोलीवासीयांच्या या आंदोलनाने पुन्हा एकदा आमगाव नगरपरिषदेतील प्रशासकीय अनास्था आणि शासनाच्या निर्णयातील विसंगती उघड केली आहे. नागरिकांना आशा आहे की, या आंदोलनाचा परिणाम ठोस कृतीतून दिसेल आणि आमगाव शहराला खऱ्या अर्थाने शहरी विकासाचा लाभ मिळेल.

 

# नेत्यांना गावबंदी करू : राणी काळसर्पे

अनेक वर्षांपासून गावकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत, जनता त्रस्त झाली आहे. नेते आपली वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नवगरिकांचा बळी घेत आहे. अश्या नेत्यांना आता गाव बंदी करू. शासनाने लवकर मार्ग काढावा अन्यथा मोठे आंदोलन करून शासनास उत्तर मागणार अशी मत यावेळी समाजसेवी राणी कालसर्पे यांनी विचार मांडले.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment