तिगाव – बघेडा रस्त्या लगत असलेल्या वनपरिक्षेत्रात नीलगाय मृत अवस्थेत आढळली; हिंसक प्राण्याच्या हल्ल्याचा संशय.
गोंदिया(आमगाव ):- आमगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तिगाव गावाजवळील बघेडा रस्त्या लगत असलेल्या वनपरिक्षेत्रात एक नीलगाय मृत अवस्थेत आढळून आली आहे. या नीलगायवर कोणत्यातरी हिंसक प्राण्याने हल्ला केल्याचे स्पष्ट खुणांवरून दिसत असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवार दिनांक २४ जुलै ला सकाळी स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावरून जात असताना त्यांना नीलगायचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृत नीलगायची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
नीलगायच्या अंगावर धारदार नखांचे आणि दातांचे खुणा स्पष्टपणे दिसत असून, त्यामुळे या हल्ल्यामागे बिबट्या किंवा वाघासारख्या हिंस्र प्राण्याचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, याबाबतची अंतिम पुष्टी शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.
वनविभागाने घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आसपासच्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी जंगल परिसरात सावध राहण्याचे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिली सूचना:-स्थानिक नागरिकांनी

वनविभागाकडे मागणी केली आहे की, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये नियमित गस्त, जनजागृती आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात.
वनविभागाची कार्यवाही सुरू:
सदर मृत नीलगायचा पंचनामा करून अहवालानंतर पुढील तपास सुरू करण्यात येईल, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी दिली.
# सतर्कतेचा सूचना नागरिकांनी पाळावे
:-हिंस्र प्राण्याच्या हालचालींचा संशय असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी जंगलाजवळ जाणे टाळावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे.


